कृषी विद्यापीठांसह प्रयोगशील शेतकर्‍यांचे ज्ञान, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणार : कृषी मंत्री कोकाटे   

पुणे : कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकर्‍यांचे ज्ञान, विद्यापीठातील ज्ञान तसेच परदेशातून आलेले ज्ञान पिकांचे वाण लोकाभिमुख कसे करता येईल. या दृष्टीकोनातून आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतीमध्ये शासकीय खर्चाने भांडवली गुंतवणूक करून शेती उत्पादनात कशी आणता येईल याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्य उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख, कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
 
समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग आहे. असे सांगून कृषी मंत्री कोकाटे म्हणाले, आरोग्य विषयी जागरूक असलेला वर्ग समाजात असून अन्न कितीही महाग असले तरी विकत घेणारा आहे. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वंयपूर्ण झालो असे नाही उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे व्यवस्थित त्याची जाहिरात होणे बाजारपेठ मिळणे आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करावयाची आहे. असेही ते म्हणाले.
 
हवामान बदलामुळे शेतीसमोर खूप आव्हान आहेत. एका क्षणात प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकर्‍यांच्या मागे उभे राहाणे आपला विचार अभ्यास प्रत्यक्षात आणणे त्यातून शेतकर्‍यांना ज्ञान देणे ही खरी काळाची गरज आहे. बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देवू शकतो, खर्च कसा कमी करू शकतो, उत्पादन चांगल्या प्रतीचे कसे घेवू शकतो त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणार्‍या सुविधा राज्यशासन कोणत्या प्रकारे देवून त्यांच्या पाठिशी उभे राहू शकते. या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा व्हावी असे ही कृषीमंत्री कोकाटे यांनी सूचित केले.
 
अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी प्रयोगशील आहेत. तंत्रज्ञानाची ओढ असल्याने नवीन आव्हानांना समोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतीमध्ये बदल करणारे आहेत. आज कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे ज्ञान काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतीत प्रत्यक्ष सुरू केले आहे.परंतु या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देवून शेतकर्‍यांच्या मागे आश्वासकपणे उभे राहाण्याचे काम शासनाला करायचे आहे.यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रास्ताविक केले, राज्यमंत्री जयस्वाल यांचे ही भाषण झाले राज्यभरातून या परिषदेला सुमारे २२०० अधिकारी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles